पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षातील ‘प्रति थेंब अधिक पीक’ (सूक्ष्म सिंचन) घटकासाठी दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी ५० लाख १ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. हा निधी सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी असून, केंद्र व राज्य शासनाचा निधी अनुक्रमे ६०:४० या प्रमाणात आहे.
याबाबतचा शासन निर्णय कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्यात २०१५-१६ पासून ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. केंद्र सरकारने २० नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे नामांतर करून तिला ‘पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना’ असे नाव दिले आहे.
सूक्ष्म सिंचन योजनेसाठी ४७७ कोटी रुपयांच्या कार्यक्रमास यापूर्वी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात २०८ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. आता दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी ५० लाख १ हजार रुपयांचा निधी कृषी आयुक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येते. तसेच अनुदानाची रक्कम आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते.
https://agrowon.esakal.com/agro-special/government-boosts-drip-irrigation-scheme