सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात पर्जन्यमानाची मोठी तफावत दिसून आली आहे. ३० सप्टेंबर २०२६ अखेरच्या महसूल मंडलनिहाय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ९८ महसूल मंडलांपैकी तब्बल ५६ मंडलांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक महसूल मंडले सरासरी पावसाच्या निम्म्यापर्यंतही पोचलेली नाहीत. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरी २११.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सोलापूरची सरासरी ४३४ मिलिमीटर आहे. त्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ४८.६ टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील काही मंडलांमध्ये पावसाने सरासरीच्या जवळपास किंवा त्यापेक्षा अधिक हजेरी लावली आहे. मात्र, अनेक भागांत पावसाची तूट कायम राहिली. विशेषतः पंढरपूर, माढा आणि मोहोळ तालुक्यांतील प्रत्येकी सात महसूल मंडलांचा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या मंडलांमध्ये समावेश आहे. अक्कलकोटमधील सहा, तर दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांतील प्रत्येकी पाच मंडले या यादीत आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे मंडलात २८.९ टक्के, मार्डीमध्ये ४९.५ टक्के, सोलापूरमध्ये ४५.४ टक्के आणि बाळे मंडलात १४.१ टक्के पाऊस झाला. दक्षिण सोलापूरमध्ये वळसंग ४८.८, होटगी ३१.२, मुस्ती ४९.९, विंचूर ४६ आणि औरादमध्ये अवघा ७.९ टक्के पाऊस नोंदला आहे. बार्शी तालुक्यात वैराग, पानगाव, सुर्डी, खांडवी आणि सौंदरे या पाच मंडलांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. अक्कलकोटमध्ये अक्कलकोट, जेऊर, तडवळ, दुधनी, वागदरी आणि चपळगाव या मंडलांचा समावेश आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/56-revenue-circles-in-maharashtra-receive-less-than-half-the-average-rainfall-aak11

माहिती शेअर करा