कोकणात उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच, राज्याच्या कमाल तापमानातही चढ-उतार सुरू आहेत. आज (ता. १६) राज्यात उन्हाचा ताप आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि दक्षिण मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
संपूर्ण देशातून मॉन्सून परतला असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय झाले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. आग्येय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेशापासून मध्य प्रदेश, महाराष्ट्र ते पूर्व – मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहेत. अनेक ठिकाणी पारा सातत्याने ३५ अंशांच्या वर आहे. गुरुवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरी येथे ३८ अंशांपेक्षा अधिक, सांताक्रूझ येथे ३७ अंशांपेक्षा अधिक, तर सोलापूर, अमरावती आणि जळगाव येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १६.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.