पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. रविवारपर्यंत पंचनाम्यांचे काम पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.त्यानंतर शासनाकडे मदतीसाठी निधीची मागणी करण्यात येणार असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गेल्या सुमारे १५ दिवसांपासून प्रत्येक तालुक्यात महसूल विभाग, ग्रामीण विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकांमार्फत काम सुरू आहे. आज सकाळी झालेल्या आढाव्यानुसार, जिल्ह्यातील बहुतांश पंचनामे पूर्ण झाले आहेत.नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांमध्येही प्रशासनाने आधीपासूनच पंचनाम्यांचे काम सुरू केले होते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतही सुमारे ६० ते ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
दुष्काळी परिस्थितीबरोबरच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांचा संदर्भ देत, डिसेंबरपासून ‘एल निनो’चा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/pune-district-80-percent-panchnama-completed-rat16