दिवाळीच्या सुट्टीत खरेदीदारांनी अडत्यांचे संपूर्ण देणे चुकते करून व्यवहार शून्यावर आणण्याची ‘झीरो पेमेंट’ची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. त्यासाठी २५ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान बेदाण्याचे सौदे बंद ठेवण्याचा निर्णय सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. २३ नोव्हेंबरपासून नियमित सौदे सुरू होतील, अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.
खरेदीदारांनी अडत्यांचे संपूर्ण देणे चुकते करून व्यवहार शून्यावर आणणे, ही संकल्पना असोसिएशनकडून गेल्या अनेक वर्षांपासून राबविली जाते. यंदाही तिची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. दिवाळीच्या सुट्टीतही खरेदीदारांनी देय रक्कम चुकती करणे बंधनकारक राहणार आहे.
सध्या बेदाण्याला प्रति किलो २६० ते ३५० रुपये दर मिळत आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत. दसरा आणि दिवाळी सणासाठी बेदाण्याला मोठी मागणी असते. सद्यःस्थितीत बेदाण्याला कमी-अधिक प्रमाणात मागणी आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/raisin-deals-zero-payment-closed-after-october-25-rat16