‘एल निनो’मुळे शेती क्षेत्र आणि ग्रामीण मागणी धोक्यात येऊ शकते, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणविषयक समितीने (RBI MPC Meeting 2026) दिला आहे. सरकारने या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीचा परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या असल्या तरी मॉन्सून हंगामातील कमी आणि असमान पावसामुळे देशांतर्गत आर्थिक वाढीच्या भविष्यातील दृष्टिकोनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण होऊ शकते, असेही स्पष्ट संकेतही देण्यात आले आहेत.

‘एल निनो’च्या परिस्थितीत सरासरीपेक्षा कमी आणि असमान पाऊस झाल्यास शेती क्षेत्राच्या भविष्यातील स्थितीवर आणि ग्रामीण मागणीला काही प्रमाणात फटका बसू शकतो, असे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटले आहे.असे असतानाही, जलसंधारण तसेच कमी कालावधीत येणारी पिके आणि हवामान बदल सहनशील पिके यांसारख्या पीक पद्धतीत बदल संबंधित सरकारच्या उपाययोजनांमुळे ‘एल निनो’च्या परिणामांची तीव्रता कमी होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी पतधोरण जाहीर करताना नमूद केले.

त्याचबरोबर, सेवा क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाढीचा वेग, जीएसटी (GST) सुसूत्रीकरणाचा कायम प्रभाव आणि रोजगाराची स्थिती स्थिर राहिल्यामुळे शहरातील मागणीला बळ मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.’एल निनो’मुळे पावसावर होणारा परिणाम हा एक प्रमुख धोका आहे. तरीही पुरवठा साखळीचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि पुरेसा धान्यसाठ्यामुळे संभाव्य धोक्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, असे मल्होत्रा यांनी म्हटले आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/rbi-mpc-meeting-2026-el-nino-warning-agriculture-economy-ddb79

माहिती शेअर करा