यंदाच्या तीव्र ‘एल निनो’मुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. आता रबी हंगामातील पिकांवर त्याचा परिणाम अधिक व्यापक आणि गंभीर स्वरुपाचा होऊ शकतो, अशी चिंता ताज्या पावसाच्या आकडेवारीवरुन तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कमी पावसामुळे अनेक राज्यांत पेरणीला उशीर झाला आहे. जमिनीत ओलावा नसणे आणि सिंचनासाठीच्या पाण्याच्या कमतरतेमुळे पेरणी क्षेत्र आणि उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रब्बी पिके घेणारे शेतकरी आता जमिनीतील ओलावा वाढावा, बियाण्यांची उगवण चांगली व्हावी आणि सिंचनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पश्चिमी चक्रावातमुळे होणाऱ्या हिवाळीतील पावसावर अवलंबून आहेत. खरीप वाया गेल्यानंतर यंदाचा रब्बी पीक हंगामही धोक्यात आहे. कारण रब्बी पिकांसाठी जमिनीत ओलाव्याची गरज आहे. तसेच सिंचनाची सुविधा उपलब्ध असायला हवी आणि हिवाळ्यात पाऊस पडणेही गरजेचे आहे. हा पाऊस विशेषतः उत्तर भारतात घेतल्या जाणाऱ्या प्रमुख गहू पिकासाठी महत्त्वाचा असतो. यामुळे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.
गव्हासह कडधान्ये आणि तेलबिया पिकांसाठीही पाऊस आवश्यक असून, त्यावर शेतकऱ्यांना रब्बी पिकांची पेरणी करायची की नाही, हे ठरवता येईल. पावसाचा अधिक काळ खंड पडल्यास रब्बी पीक क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. तसेच, जमिनीतील ओलाव्याअभावी पीक उत्पादनात घट होऊ शकते, अशी चिंता शेती क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/el-nino-impact-rabi-crops-rainfall-deficit-ddb79