पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आठवड्याच्या शेवटी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण शुक्रवारपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाला सुरुवात होऊ शकते, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
मध्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. तसेच, माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबमधील फिरोजपूर, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि बस्ती तसेच बिहारमधील देहरी आणि पश्चिम बंगालमधील दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. त्याचबरोबर दक्षिण गुजरात ते पूर्व उत्तर प्रदेश आणि शेजारच्या मध्य प्रदेशातील काही भागात कमी दाबाचा पट्टा कायम आहे.ब क्षेत्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तेलंगणापासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राज्यात शुक्रवारपासून काही भागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. गुरुवारीही काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. परंतू पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाला पोषक हवामान नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.