पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) भाग्यश्री मुंडे यांनी केले आहे.

राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याबरोबरच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी सहकार आयुक्त व निबंधक (सहकारी संस्था) यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज किंवा त्याच कालावधीत वाटप झालेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन अथवा फेरपुनर्गठन करून मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर केलेले कर्ज विचारात घेतले जाणार आहे.

३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेली व ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली मुद्दल व व्याजासह कमाल दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्जमुक्तीस पात्र राहणार आहे.यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (२०१७) आणि महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (२०१९) यांचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही कमाल ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/agristack-registration-mandatory-for-farm-loan-waiver

माहिती शेअर करा