विविध देशांच्या शेती अभ्यास दौऱ्यांसाठी शासनाने आता १ लाखाऐवजी किमान २ लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेला खर्च पाहता अनुदान वाढवा, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली होती. विविध देशांच्या शेती अभ्यास दौऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अनुदान ‘जैसे थे’ होते. मात्र दौऱ्यात लागणारा खर्च वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना याची झळ बसत होती. दुसरीकडे शासनाकडून शेतकऱ्यांना दौऱ्यासाठी दिले जाणारे अनुदान मात्र तेवढेच होते. त्यामुळे वाढता खर्च न परवडून अभ्यास दौरा करू इच्छिणारे सर्वसामान्य शेतकरी दौऱ्यात जाऊ शकतील का हा प्रश्न होता.
त्याच वेळी मागील वर्षी शेतकऱ्यांची निवड होऊनसुद्धा काही कारणास्तव दौरा रद्द करण्यात आला होता. त्या वेळी कंपनीचे मापदंड खूप कमी होते. यंदाच्या दौऱ्याचे कोटेशन खूप वाढविलेले दिसते. ते सर्वसाधारण शेतकऱ्याला परवडणारे नाही, अशी भावना व्यक्त केली होती. यंदा योजनेच्या एकूण खर्चात तिप्पट वाढ झाल्याचे खर्चाचे पुढे आलेले आकडे सांगत असताना शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या अनुदानात कसलीही वाढ करण्याची गरज शासनाला वाटू नये याविषयी आश्चर्यही व्यक्त केले जात होते.
https://agrowon.esakal.com/agro-special/increase-in-subsidy-for-farmers-study-tours-abroad-rat16